व्हॅक्सिन (लस) म्हणजे काय?
विविध रोगांविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती (Immunity) निर्माण होण्यासाठी लस दिली जाते. गोवर, कांजिण्या, पोलिओ अशा विविध संसर्गजन्य रोगांच्या विरूद्ध प्रभावी ठरणार्या लसी लहान मुलांना विशिष्ट कालानुक्रमे दिल्या जातात. अशाप्रकारे लसीकरण झालेले असल्यास त्या त्या रोगांविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते हे तुम्हाला माहीत असेलच आणि तुमचेही लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत लसीकरण झालेले असेलच.
मात्र अशाप्रकारे रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणारी लस म्हणजे नेमके असते काय? ती कशाप्रकारे कार्य करते? लस शरीरात रोगप्रतिकारशक्ती कशी निर्माण करते? असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले असतीलच.
लस म्हणजे काय? याचे उत्तर जाणून घेण्याआधी आपण शरीरातील रोगप्रतिकारसंस्था (Immune System) म्हणजे काय व ती कशी कार्य करते हे जाणून घेण्यासाठी रोगप्रतिकासरसंस्था कशी कार्य करते? हा लेख वाचा.
आपल्या शरीरात शिरलेले रोगजंतू हे शरीरात असणार्या रोगप्रतिकार पेशींद्वारे ओळखले जातात जर त्यांचा यापुर्वी सामना झालेला असेल तर ही रोगप्रतिकार संस्था त्या रोगजंतूला त्वरीत निरस्त करून नष्ट करू शकते. मात्र हा रोगजंतू नवीन असेल तर आपल्या रोगप्रतिकारसंस्थेला त्याला नष्ट करण्यासाठी वेळ लागतो. काही रोगजंतू असे असतात की जे त्यांच्यामधे असलेल्या विशिष्ट क्षमतेमुळे आपलया रोगप्रतिकारसंस्थेपासून लपून राहतात किंवा रोगप्रतिकारसंस्थेच्या हल्ल्यांना प्रतिकार करतात व मारले जात नाहीत. असे रोगजंतू शरीरा वाढल्यास संसर्गजन्य रोगांना कारणीभूत ठरतात. गोवर, कांजिण्या, टायफॉइड, पोलिओ हे अशा रोगजंतूंमुळे होणारे रोग आहेत. हे रोग प्राणघातक ठरू शकतात किंवा कायमचे अपंग करू शकतात. असे रोग होऊ नयेत म्हणून लस देण्यात येते.
लस ही त्या विशिष्ट रोगजंतूचे निष्क्रिय किंवा अशक्त केलेले रूप असते. अशाप्रकारे लसीतून अशक्त किंवा मृत रोगजंतू किंवा त्यांचे घटक शरीरात (तोंडावाटे किवा इंजेक्शनने) सोडल्यास रोगप्रतिकारसंस्था सहज त्यांना ओळखते, निष्क्रिय करते व नष्ट करते. या प्रक्रियेत रोगप्रतिकारक पेशींना या रोगजंतूबरोबर लढण्याचे प्रशिक्षण मिळते व स्मृती टी-पेशी अशा रोगजंतूची ओळख जतन करून ठेवतात.
पुन्हा कधी त्याप्रकारचा जिवंत व सशक्त रोगजंतू जरी शरीरात शिरला तरी आता रोगप्रतिकारसंस्थेला त्याचा सामना कसा करायचा हे माहित असल्यामुळे त्वरेने त्याला निरस्त केले जाते व नष्ट केले जाते व अशाप्रकारे शरीराचा रोगसंसर्ग होण्यापासून बचाव होतो.