पर्सिव्हरंस आणि इन्जेन्युइटी
पर्सिव्हरंस, हे नासाने च्या ‘मार्स २०२०’ च्या मोहिमेचा भाग म्हणून मंगळ ग्रहावर पाठवलेले मार्स रोव्हर आहे. पर्सिव्हरंस म्हणजे चिकाटी, सतत प्रयत्न करत राहण्याची क्षमता. तर रोव्हर म्हणजे निरिक्षण करत फिरणारी यांत्रिक गाडी. पर्सिव्हरंस रोव्हर, हे मंगळावरील ‘जेझेरो क्रेटर’ या भलामोठ्या खड्ड्याच्या भागाचे निरिक्षण करत आहे. पर्सिव्हरंस रोव्हर, हे मंगळावर यापुर्वी पाठवलेल्या ‘क्युरिऑसिटी’ या रोव्हरपेक्षा थोडे अधिक अद्ययावत रोव्हर आहे. पर्सिव्हरंस रोव्हरला ‘पर्सी’ या टोपणनावाने संबोधले जाते.
पर्सिव्हरंस रोव्हर हे यशस्वीरित्या मंगळावर उतरले याची खात्री 18 फेब्रुवारी 2021 रोजी त्याने पृथ्वीवर पाठवलेल्या संदेशाद्वारे झाली.
आत पर्सिव्हरंस रोव्हर असलेली कुपी मंगळावर उतरतानाचा थरारक व्हिडिओ तुम्ही वर बघू शकता
या रोव्हर मधे सात उपकरणे, एक कॅमेरा आणि दोन मायक्रोफोन (ध्वनीग्राही) आहेत. पर्सिव्हरंस रोव्हरच्या सोबत एक मिनी-हेलिकॉप्टर (ड्रोन एवढ्या आकाराचे) मंगळावर नेण्यात आले आहे. या हेलिकॉप्टर ला ‘इन्जेन्युइटी’ हे नाव देण्यात आले आहे. इन्जेन्युइटी म्हणजे चतुराई, नवोन्मेषता म्हणजेच अडचणी सोडवण्यासाठी नाविन्यपुर्ण भन्नाट कल्पना सुचण्याची क्षमता.
इन्जेन्युइटी हेलिकॉप्टर पर्सिव्हरंस रोव्हरच्या पोटातून बाहेर पडताना. पर्सिव्हरंस मधून निघताना आधी इन्जेन्युइटी हेलिकॉप्टरचे पाय सरळ उघडले गेले व नंतर ते मंगळाच्या जमिनीवर उभे पडले
इन्जेन्युइटी हेलिकॉप्टर हे फिरत्या पात्यांच्या सहाय्याने हवेत उडू शकणारे साधे उपकरण आहे. याच्यावर सोलार पॅनेल बसवलेले असून त्याद्वारे सुर्यप्रकाशातील उर्जेचे रुपांतर विद्युत उर्जेत करून त्यातील विद्युत घट प्रभारित करता येतील. या हेलिकॉप्टरचे स्वरूप हे प्रयोगात्मक आणि तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरूपात प्रदर्शन करणे हे आहे. इन्जेन्युइटी हेलिकॉप्टर उड्डाणाच्या द्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग भविष्यात अधिक आधुनिक व सुधारीत व वैज्ञानिक उपकरणांनी सज्ज हेलिकॉप्टर बनवण्यासाठी केला जाइल.
इन्जेन्युइटी हेलिकॉप्टरचे पाते फिरत असल्याचे चित्रण
इन्जेन्युइटी हेलिकॉप्टर ने 19 एप्रिल 2021 रोजी मंगळावर आपले पहिले उड्डाण यशस्वी केले. पृथ्वीव्यतिरिक्त इतर ग्रहावर हवेत झालेले हे पहिले उड्डाण होते त्यामुळे ही एक ऐतिहासिक घटना मानली जाते. कुठल्याही ग्रहावर उडण्यासाठी तेथे वातावरण असावे लागते. मंगळ ग्रहावरील वातावरण हे पृथ्वीवरच्या वातावरणाच्या तुलनेत सुमारे केवळ 1 टक्का इतके विरळ आहे व गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या तुलनेत 37.5 टक्के इतके कमी आहे. अशा अत्यंत विरळ वातावरणात उड्डाण यशस्वी करणे ही एक मोठी उपलब्धी मानली जाते.
इन्जेन्युइटी हेलिकॉप्टरचे पहिले उड्डाण. पर्सिव्हरंस रोव्हरच्या कॅमेर्याने काही अंतरावरून हे चित्रण केले आहे.
इन्जेन्युइटी हेलिकॉप्टरने उड्डाणादरम्यान त्याच्या कॅमेर्याद्वारे मंगळग्रहावरील जमीनीचे केलेले चित्रण