Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Menstrual cycle’ in Marathi
‘Menstrual cycle’ चा मराठी अर्थ
शब्द: Menstrual cycle
उच्चार: मेन्स्ट्रुअल सायकल
अर्थ: आर्तवचक्र, ऋतुचक्र, मासिक पाळी, स्त्रीप्रजन संस्थेचे मासिक चक्र
अधिक माहिती: स्त्रीमधे मासिक चक्र हे साधारणतः 28 दिवस चालते. मासिक रक्तस्राव सुरु होण्याच्या पहिल्या दिवसाला menstrual cycle चा पहिला दिवस समजले जाते. हा रक्तस्राव साधारणतः पाच दिवस सुरु असतो. मासिक चक्राच्या सुरुवातीला पाचव्या दिवसापासून इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशय (युटेरस) च्या अंतःस्तराची (एन्डोमेट्रिअमची) पुनर्निमिती होते ती 13 व्या दिवसापर्यंत चालते. 14 व्या किंवा 15 व्या दिवशीओव्हरी (अंडाशय) मधे वाढणाऱ्या फॉलिकल (पुटिका) ची वाढ पूर्ण झाल्यानंतर ‘पितपिंडकारी संप्रेरक’ (Luteinizing hormone) च्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका (फॉलिकल) फुटते व त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. याला ओव्ह्युलेशन (अंडमोचन) असे म्हणतात. अंडाशयामध्ये राहिलेल्या फुटलेल्या पुटिकेपासून पितपिंड (Corpus luteum) तयार होते. हे पितपिंड ‘प्रोजेस्टेरॉन संप्रेरक’ स्त्रवण्यास सुरुवात करते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील (एन्डोमेट्रिअमच्या) ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात होते व असे अंतःस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते. ही स्थिती 16 ते 28 व्या दिवसांपर्यंत असते. ओव्ह्युलेशन नंतर अंडपेशीचे शुक्रजंतूद्वारे 24 तासात फलन न झाल्यास पितपिंड (कॉर्पस ल्युटिअम) अकार्यक्षम होते व ते श्वेतपिंडात (Corpus albicans) रुपांतरित होते. यामुळे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्त्रवणे पूर्णपणे थांबते. या दोन्ही संप्रेरकांच्या अभावामुळे 28 व्या दिवसानंतर गर्भाशयाचा अंतःस्तराचे (एन्डोमेट्रिअमचा) विघटन होण्यास सुरुवात होते व अंतःस्तराच्या ऊतींचे अवशेष आणि अफलित अंडपेशी (एग) हे रक्तस्रावासोबत योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. हा रक्तस्त्राव साधारणतः पाच दिवस सुरु राहतो. या चक्रालाच ऋतुचक्र किंवा मासिक चक्र (menstrual cycle) असे म्हणतात.