Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Electronic configuration’ in Marathi
‘Electronic configuration’ चा मराठी अर्थ
शब्द: Electronic configuration
उच्चार: इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन
अर्थ: इलेक्ट्रॉन संरूपण
अधिक माहिती: एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण होय. कवचांच्या कमालधारकतेनुसार अणूमधील इलेक्ट्रॉनांचे कवचांमध्ये वितरण होते. K, L, M, N …. या कवचांमध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त, 2, 8, 18, 32…. इलेक्ट्रॉन सामावले जाऊ शकतात. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण स्वल्पविरामांनी विलग केलेल्या अंकांनी दर्शवितात. इलेक्ट्रॉन संरूपणातील अंक ऊर्जेच्या चढत्या क्रमाने असलेल्या कवचांमधील इलेक्ट्रॉन संख्या दर्शवितात. उदाहरणार्थ, क्लोरिनचे कवचानु्सार इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,7 आहे. याचा अर्थ सोडिअम अणूमध्ये पहिल्या ‘K’ कवचात 2, दुसर्या ‘L’ कवचात 8 व तिसर्या ‘M’ कवचात उरलेले 7 याप्रमाणे एकूण 17 इलेक्ट्रॉन विविध कवचांमधे वितरित केलेले असतात. (क्लोरिनचा अणुंक 17 आहे म्हणजे त्याच्या अणुमधे 17 इलेक्ट्रॉन असतात). याच प्रत्येक K, L, M, N कवचातील इलेक्ट्रॉन त्या कवचातील उपकवचामधे उपकवचांच्या जास्तीत जास्त क्षमतेप्रमाणे वितरित केलेले असतात. कवचांमधे s, p, d, f हे उपकवच असतात. s उपकवचामधे जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन, p उपकवचामधे 6, d उपकवचामधे 10 व f उपकवचामधे जास्तीत जास्त 14 इलेक्ट्रॉन सामावले जाऊ शकतात. उपकवचांतील मांडणीनुसार क्लोरिनचे इलेक्ट्रॉनिक संरूपण 1s², 2s², 2p⁶, 3s², 3p⁵ याप्रकारे असू शकते. म्हणजे पहिले कवच K मधे 2 इलेक्ट्रॉन (1s²), दुसरे कवच L मधे 8 इलेक्ट्रॉन (2s², 2p⁶), तिसरे कवच M मधे 7 इलेक्ट्रॉन (3s², 3p⁵) याप्रकारे उपकवचांमधील इलेक्ट्रॉनची मांडणी दर्शविली जाते.