काच पारदर्शक का असते?
काच हा असा पदार्थ आहे ज्यातून प्रकाश आरपार जाऊ शकतो. प्रकाश आरपार जात असल्यामुळे काचेच्या पलिकडे असलेली वस्तू आपण सहज पाहू शकतो. मात्र कधी विचार केलात का की काचेचा असा गुणधर्म का आहे?
असे कुठले पदार्थ आहेत जे काचेप्रमाणे पारदर्शक असतात? आठवू शकता का? पाणी, पारदर्शक प्लास्टिक, क्वार्ट्झ, हिरा हे पदार्थ पारदर्शक असतात.
एखादा पदार्थ पारदर्शक असण्यासाठी त्याच्यातून प्रकाशाचे किरण आरपार जाणे आवश्यक असते. अनेक पदार्थ दृश्यप्रकाशातील सर्व किरणे शोषून घेतात किंवा त्यातील सात रंगांच्या किरणांपैकी काही किरण शोषून घेतात व बाकीचे परावर्तीत करतात. असे पदार्थ अपारदर्शक असतात. त्यांच्यातून आरपार दिसू शकत नाही. विकिरणामुळेही प्रकाश काही पदार्थांमधून आरपार जाऊ शकत नाहीत जसे की धूळ, धूर, वाफेचे ढग इ. असे पदार्थ प्रकाश सर्व दिशांना विखुरल्यामुळे दुधाळ दिसतात.
काही पदार्थ सर्व प्रकाशकिरणे शोषून किंवा विकिरित न करता काही प्रमाणात प्रकाशकिरण आरपार जाऊ देतात. असे पदार्थ अर्धपारदर्शक असतात.
मग काचेचे असे वैशिष्ट्य ज्यामुळे काच पारदर्शक असते, ते तुमच्या लक्षात आले असेलच. काच दृश्यप्रकाश शोषून घेत नाही. दृश्यप्रकाश म्हणजे आपल्याला डोळ्यांनी जाणवणारा, बघता येणारा प्रकाश (तानापिहिनिपाजा). कुठलाही पदार्थ कुठल्या तरंगलांबीचा प्रकाश शोषून घेईल हे त्या पदार्थामधे असलेल्या अणुंमधील इलेक्ट्रॉनच्या संरूपणावर ठरते. दृश्यप्रकाशातील किरणांची तरंगलांबी हे काच व इतर पारदर्शक पदार्थ शोषून घेऊ शकत नाहीत त्यामुळे ते पारदर्शक असतात.
अतिनील किरण हे आपल्या डोळ्यांना न जाणवणारे किरण आहेत. हे अतिनील किरण किंवा अल्ट्राव्हायलेट किरण हे काचेद्वारे शोषले जातात. त्यामुळे दृश्यप्रकाशात (तानापिहिनिपाजा) पारदर्शक असणारी काच अतिनिल किरणांसाठी मात्र अपारदर्शक असते. यामुळेच अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी काचेचा चष्मा वापरला जातो.